अरे संसार संसार | सुंदर विचार | नवरा बायको छान विचार मराठी

1
918
अरे-संसार-संसार-सुंदर-विचार-नवरा-बायको-छान-विचार-मराठी
अरे-संसार-संसार-सुंदर-विचार-Good-Thoughts-Marathi-Suvichar-navara-bayko

अरे संसार संसार | सुंदर विचार | नवरा बायको छान विचार मराठी

आज तुम्हाला नाश्ता मध्ये काय खायची इच्छा आहे…!
नेहमीच्या ठसक्यात बायकोने दररोजचाच प्रश्न केला ..!
तुला जे वाटेल कर ते…!
ब्रश करता करता मी अर्धवट बोबड्या आवाजात उत्तर दिले…!

दररोज सारखेच… पोहे…? मी नाक मुरडले…!
उपमा…! मी उगाचच खाकरत विरोध नोंदवला…!
थालीपीठ…? चांगलेसे काहीतरी कर ना…
असे म्हणत मी टॉवेलला तोंड पुसले…!

तोंड पुसून जेव्हा चेहऱ्यावरचा टॉवेल बाजूला झाला तेव्हा ती माझ्याच
समोर रखुमाई बनून उभी होती…! म्हणजेच कमरेवर हात…
तुम्हाला काहीच कसे चालत नाही…!
रोज रोज वेग वेगळे पदार्थ आणायचेतरी कुठून…?

मी काहीसा स्वतःला वाचवत… तसे नाही ग… वेगळे काहीतरी हवे
इतकेच फक्त…! आणि तिचा आवाज अजूनच चढला…
वेगळे म्हणजे काय…?

अरे संसार संसार

मला कळत नाही… तुम्हीच सांगा… मी खायला करून घालते…!
मग बराच वेळ मलाही काही सुचले नाही…! पण मी मात्र बळबळत
राहिलो… सकाळचा नाश्ता चांगलाच पाहिजे…! कारण त्यावर पूर्ण
दिवसाचा मूड ठरतो.

आणि तिकडे तिचा पारा चढलेला… सकाळची धावपळीची वेळ राहते….
मुलींची शाळा… त्यात माझी गडबड… रात्रीची भांडी… आणि त्यात
ह्याचे हे खाण्यापिण्याचे चोचले…!

पटकन खाऊन मोकळे व्हायचे… ते नाही…! अगदी माझा अंत पाहतात…!
आणि बोलता बोलताच तिने फ्रिज उघडला…

फ्रीझच्या पिवळ्या प्रकाशातून बाहेर डोकावत ती तिथूनच ओरडली…
मटकी आहे मटकी… मिसळ करू का…?

एवढ्यात मी स्वयपाक घराच्या दारात आलेलो होतो…!
डोळ्यात थोडी चमक आली… चालेल, पण… थोडी तिखट कर हां… !

तिने फणकारत मटकीचे भांडे फ्रिज मधून बाहेर काढले…!
हो बाबा… मीच शिरते ना त्यात आता…!
तसाच मी दांडगाईने म्हणालो…. अगं… तिखट ऐवजी गोड होईल
मग ती…!

आता मात्र तिचा हात थांबला… तिने माझ्याकडे पाहिले…!
मटकी गॅसवर चढेपर्यंत राग पूर्ण ओसरलेला…….!
आणि गालावर एवढ्यात लाजेची खळी फुटलेली …!

तात्पर्य काय …

आपल्याला योग्य वेळी संसारात योग्य शब्दांची फुंकर घालता यायला हवी…!

म्हणजे मग नवरा बायकोचे भांडण फार वेळ धगधगत राहत नाही…

(नवरा बायको दोघांनाही लागू ..)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here