Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – व्यंग
कहाणी – कथा – Marathi Story
कसलीही चेष्टा करावी. परंतु…. ती फक्त गंमत किंवा मस्करी म्हणूनच…
एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे किंवा त्या व्यंगाचा उल्लेख करून
चारचौघांत त्याचा अपमान करणे हे चुकीचे असते…
ते सभ्यतेचे लक्षण तर नाहीच.
तरीपण जर एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर
उलटूही शकते…! याचे नेहमी भान ठेवावे.
आपला विशाल एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता,
तेवढ्यातच समोरून रजनी येतांना दिसली. ती थोडीशी
एका डोळ्याने तिरळी होती.
विशालचा स्वभाव मुळातच कडू होता… त्यात थोडे तिरळे बघणारी
रजनी समोरून आलेली पाहून विशाल म्हणाला… काय रजनी…!
कसे काय… सगळे ठीक आहे ना…? कुठे चालली आहेस…?
आणि हो… तुला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात असे म्हणतात….
खरे आहे का…?
रजनीच्या लक्षात आले की… विशाल आपली चेष्टा करीत आहे…!
हा आपल्याला हिणवत आहे…! सगळे लक्षात येताच रजनी म्हणाली….
हो खरे आहे हे…! आता तू हेच बघ ना… तुला तर दोनच पाय आहेत ना….?
परंतु मला ना… तुला चार पाय असल्याचे दिसत आहे…!
तात्पर्य : कधीही दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये.
तसेच त्याचा उपहासही करू नये.
Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – मोठेपण – Good Thoughts In Marathi On Life
जगप्रसिद्ध विद्वान… तत्त्ववेत्ता…. म्हणून मैक्स मूलर यांना ओळखले जाते.
ही कथा त्यांच्याच जीवनातील आहे.
ज्या महाविद्यालयातून मैक्स मूलर यांनी शिक्षण घेतले होते…
त्याच महाविद्यालयात नंतर त्यांची प्राचार्य म्हणून नेमणूक झाली.
आपण ज्या महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेतले… त्याच ठिकाणी
आपल्याला शिकविण्याचे महान कार्य करायला मिळणार आहे याचा त्यांना
खूप खूप आनंद झाला होता. आणि त्या आनंदाच्या भरातच त्या दिवशी
ते आपले पदभार सांभाळायला गेले.
ते महाविद्यालयात आले आणि आपल्या खुर्ची समोर येऊन उभे राहिले.
काहीवेळ त्या खुर्चीकडे पाहत राहिले… आणि नंतर तिथल्या शिपाई कडून
दुसरी खुर्ची मागविली… व त्या खुर्चीच्या जवळच ठेवली…! आणि त्या
दुसऱ्या खर्चीवर ते बसले. कारण त्यांनी विचार केला की…
आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना या खुर्चीवर आपले
प्राचार्य बसत होते. आणि आजही आपण तितके मोठे झालो नाहीत…
आणखीन आपणाला भरपूर शिकायचे आहे.
तात्पर्य :
आपण कितीही मोठे झालो…
तरीही आपले पाय जमिनीवरच असू द्या.
त्यामुळे आपली विद्वत्ता… यश… आणखीन खुलते…!
मराठी बोधकथा – मनाचे दार – Moral Story In Marathi
ईश्वर कसा आहे….? याचे खूपच सुंदर वर्णन आचार्य विनोबांनी केले आहे.
आचार्य म्हणतात की… भगवंत हा अगदी आपल्या मोठ्या प्रतिष्ठीत
पाहुण्यासारखा आहे.
जसा एखादा आपला पाहुणा दारात उभा राहतो… दारावर टकटक करतो….
परंतु जो पर्यंत आपण दार उघडून आत या म्हणत नाही…
तो पर्यंत पाहुणा आत येत नाही….! तसाच ईश्वर सगळीकडे आहे…!
फक्त ईश्वर हा तुमच्याच दारात उभा आहे… असे मुळीच नाही….
ज्या प्रमाणे सूर्याची किरणे तर सगळीकडे पसरलेली असतात…
परंतु बंद दारातून आत येऊ शकत नाहीत. त्यासाठी जरी दाराला
केवळ लहान का होईना फट असेल… थोडेसे दार उकूळ असेल…
तरी त्यातून प्रकाशाचे दूत घरात प्रवेश करतात.
या सारखेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजेच…
मनाचे दार उकूळ करणे आहे. त्या दिनानाथ ला आव्हान करून
बोलवण्यासारखेच आहे…!
ईश्वर… गुरु…. प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ह्यांत एवढी शक्ती असतेच
आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतोच. परंतु भगवंत
न बोलवीता आलेल्या पाहुण्यासारखा दारात उभा असतोच.
असे भगवंताचे स्वरूप मांडून आचार्य विनोबां यांनी प्रार्थनेचे
महत्व समजवून सांगितले आहे.
तात्पर्य :
या चराचरतील दिव्य शक्तीसाठी आपल्या मनाची दारे
उघडी ठेवल्याशिवाय दैवी स्पर्धांचा अनुभव घेणे अवघडच आहे.
बोधकथा – मातृभाषा आणि संस्कार – Moral Story In Marathi
आज एक विचार माझ्या वाचनात आला… आपल्या पाल्यांना
मातृभाषेतूनच शिक्षण द्या. हे शिक्षण अखेरपर्यंत टिकेल.
तसा हा विचार अनेक विचारवंतांनी
सांगितलेला आहे असे त्या लेखात लिहलेले होते…!
जरी असे असले तरीही आपण आपल्या अहंकारापायी
आपल्या मुलांना परभाषेतूनच शिक्षण देतो.
एक बहुभाषिक माणूस एकदा नाना फडणवीस यांच्याकडे गेला…
आणि म्हणाला की… साहेब मला सोळा भाषा अगदी उत्तम प्रकारे येतात.
माझी खरी मातृभाषा कोणती आहे… हे आपण ओळखून दाखवाल काय…?
यावर नाना फडणवीस म्हणाले, मी आपली मातृभाषा नक्कीच
ओळखणार…. परंतु आता दरबारात महत्वाचे काम आहे…
त्यामुळे आज तर शक्य नाही, पण मी उद्याला नक्की सांगतो.
मी तुमचे भाषा ओळखण्याचे आव्हान स्वीकारत आहे.
रात्रीला नानांनी त्या बहुभाषिक व्यक्तीला पोटभर जेवायला दिले…
जास्त जेवण केल्याने त्या व्यक्तीला गाढ झोपी आली.
मध्यरात्रीला तो गाढ झोपेत असतांना नाना त्याच्या जवळ गेले…
आणि मटकाभर थंडे पाणी त्याच्या अंगावर टाकले….
यावर तो व्यक्ती मोठ्याने कानडी भाषेत ओरडत उठला….!
अहो नाना… हे आपण काय केले…?
यावर नाना फडणवीस त्याला म्हणाले… महोदय…
आपली मातृभाषा कानडी आहे…
तो बहुभाषिक व्यक्ती एकदमच आश्चर्य चकीत झाला.
तात्पर्य :-
मातृभाषा आणि तिचे संस्कार आपणाला अखेरपर्यंत सोबत असतात…!
मराठी बोधकथा – आपण उपकार कुणावर करावे…? | Moral Story In Marathi
एका जंगलात एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या गुहेतच
पिल्लांना ठेवून स्वतः शिकार करण्यासाठी जंगलात
लांब निघून जातात.
ते वाघ आणि वाघीण तीन दिवस आपल्या गुहेत परत येतच नाही.
गुहेतील पिल्लांना खूप जोराची भूक लागलेली असते….
पिल्लांची भुकेची कलकल जवळच चरत असलेल्या शेळीला
ऐकायला येते.
शेळीला पिल्लांची खूप दया येते…! आणि शेळी वाघिणीच्या पिलांना
आपले दूध दुध पाजते…! दुध पिऊन गुहेतील पिल्लांच्या जीवात जीव येते…!
शेळी आता दरदिवशी येऊन त्या पिल्लांना दूध पाजते…! तिसऱ्या दिवशी
पिल्ले पोट भर दुध पिऊन मस्ती करत असतात… तेवढ्यातच
वाघ आणि वाघीण आपल्या गुहेकडे परत येतात तर त्यांची नजर
समोर असलेल्या शेळीवर जाते…
शेळीला पाहताच दोघेही खूप आनंदी होतात… आणि आयती शिकार मिळाली
ह्या आनंदात शेळीवर वाघ हल्ला करणार…. इतक्यातच वाघाची पिल्ले
सांगतात…
आपल्या दोघांच्या गैरहजरीत या शेळीने आपले दुध पाजून आम्हाला
जिवंत ठेवले…! जर ही नसती तर आम्ही तुम्हाला जिवंत मिळालेच नसते…!
आई – बाबा या शेळीचे आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहे…!
कृपया आपण तिला मारू नका.
पिल्लांचे म्हणणे एकूण वाघ – वाघीण खूप आनंदी झाले आणि शेळीला म्हणाले…
आम्ही तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही… आता तू अगदी निर्भिकपणे…
मजेत या जंगलात एकटी वावरू शकतेस…! आता तुला कुणाचीही तुला त्रास
देणार नाही. हे मी तुला वचन देतो…! वाघाचे असे वचन दिल्यावर
ती शेळी आता जंगलात हिमतीने कुठेही फिरायला लागली….!
एकदा तर त्या शेळीला वाघाच्या पाठीवर उभी होऊन उंच झाडांची
पाने खातांना एका कबुतराने बघितले आणि अगदी आश्चर्याने कबुतर
शेळीला या चमत्कारा बद्दल विचारतो…
शेळी कबुतराला घडलेली सर्व गोष्ट सांगते… उपकाराचे महत्व कबुतराला
समजले… आणि आपण ही कुणावर तरी उपकार नक्की करणार
असे त्याला त्याने आपल्या मनात ठरवले.
एकदा कबुतर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले चिखलात
फसलेली दिसली…
ती चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती… परंतु त्यांना
यश येत नव्हते… आणि ते चिखलात आणखीन फसत होते…
हे कबुतराच्या लक्षात येताच त्याने उंदराच्या
पिल्ल्यांना चिखलातून बाहेर काढले…
उंदराची पिले चिखलाने भरलेली होती आणि थंडीने कुळकुळत होती…
कबुतराने त्यांना आपल्या पंखात घेऊन काही वेळ ऊब दिली.
नंतर आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुतराने उंदराच्या पिल्लांचा
निरोप घेतला आणि आकाशात उडण्याचा प्रयत्न केला…
परंतु कबुतराला काही उडता येईना…. तो अस्वस्थ झाला आणि त्याने
त्याचे कारण शोधले तर… त्याच्या लक्षात आले की…
उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या कबुतराचे संपूर्ण पंख कुरतडले होते.
कबुतर तिथून कसा बसा फडफडत शेळी जवळ
गेला आणि त्याने शेळीला सर्व सांगत विचारले की…
शेळी, तू ही उपकारच केलेस आणि मी ही उपकारच केले…
परंतु आम्हा दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले…?
शेळी मंद मंद हसली आणि गंभीरपणे म्हणाली…
आयुष्यात कधीही उपकार हा वाघा सारख्या मोठ्या स्वभावाच्या
व्यक्तीवरच करावेत…. उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण…
नेहमी आपल्या स्वार्थासाठी… स्वार्थी लोक दुसऱ्या पर्यायाच्या शोधात असतात…!
त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधला कि… ते खऱ्याखुऱ्या आणि प्रमाणिक माणसाला सुद्धा
विसरण्यात स्वतःची महानता समजतात….! फक्त मोठ्या स्वभावाचेच…
निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्याऱ्याला लक्षात ठेवतात…!
बोधकथा – व्यर्थ चा अभिमान नको…! – Moral Story In Marathi
एका गावात एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीला नेहमीच
असे वाटत असे कि तिच्या जवळ असलेला कोंबडा दररोज सकाळी
आरवतो म्हणूनच या गावात सूर्य उगवतो आणि इथे सकाळ होते.
ही गोष्ट ती गावात ही मोठया अभिमानाने सांगत असे आणि गावकरी
तिला वेडी समजत…!
जे सज्जन व्यक्ती होते ते म्हातारीला वेडी समजून दुर्लक्ष करीत….
पण काही कारटे तिला त्रास देत असत… हळूहळू त्रास देणाऱ्यांची
संख्या वाढत गेली आणि आता ते म्हातारीला सहन होत नव्हतेच…
म्हणून तिने आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
म्हातारीने रात्रीच्या वेळी गावं सोडला आणि आपला कोंबडा सोबतच घेतला
आणि म्हातारी दुसऱ्या गावी जायला निघाली….
तिने विचार केला की… मी या गावातून दुसऱ्या गावी रात्रीला निघतो…
ज्यामुळे कोंबडा या गावात आरवणार नाही… त्यामुळे या गावात
सूर्य निघणारच नाही… मग सगळे गावकरी बोंबलायला लागतील…
तेव्हाच त्यांना समजेल की म्हातारीला त्रास देण्याचे काय परिणाम होतात…!
मग मला शोधत फिरतील… आणि रडत बसतील…!
म्हातारी दुसऱ्या गावात गेली. जाता जाता दुसरा दिवस ही उजाडला…
तिचा कोंबडा ही आरवला. ती ज्या गावात गेली होती… त्या गावात सूर्य ही
उगवला होता.
त्या सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली… हा इथे सूर्य उगवला आहे…
आता माझ्या जुन्या गावात कुठला सूर्य उगवणार…?
सारे गावकरी रडत बसले असतील…
मला छळता काय…? आता भोगा आता आपल्या कर्माची फळे…!
आणि म्हातारी जोरात हसायला लागली…
आपण त्या गावकऱ्यांची कशी जीरवली याचा तिला अभिमान
वाटायला लागला…
परंतु… तिला माहीतच नव्हते की त्या तीच्या जुन्या गावात
आज सूर्य उगवला होता.
तात्पर्य :- हे जग आपल्यामुळेच चालते….
असा व्यर्थचा अभिमान कधीही बाळगू नये.
बोधकथा – असत्य…! – Marathi Moral Story
एक गरीब शेतकरी आपली केस घेऊन एका नामवंत वकिलाकडे गेला. त्या शेतकऱ्याची
केस तशी साधीच होती. त्यातून त्याला सुटका पाहिजे होती… परंतु… पुरावे… साक्षीदार…
उलट – पुलट तपासणीत शेतकऱ्याला बोलताच आले नसते.
शेतकरी हा गरीब… आणि अशिक्षित होता. वकिलाने यावर एक उपाय काढला.
वकील शेतकऱ्याला म्हणाला… काका…! तुम्ही काही काळजी करू नका…
आणि घाबरूही नका. फक्त तुम्ही मी जसे सांगतो… अगदी तसेच करा.
मी तुम्हाला यातून बाहेर काढतो…
शेतकऱ्याला थोडे बरे वाटले… तो आनंदी झाला…. वकील शेतकऱ्याला सांगायला
लागला की…कोर्टात कोणत्याही प्रश्नांचे उत्तर अजिबात द्यायचे नाही…
तर तुम्ही केवळ आ…आ… असेच बोलायचे…
कोर्टात साक्ष देतांना… शेतकऱ्याने अगदी तसेच केले. त्यावर वकिलाने कोर्टात
स्पष्ट केले की….
हा शेतकरी पूर्णतः अशिक्षित आहे आणि थोडा फार वेडाही आहे…!
अशा तऱ्हेने युक्तिवाद करून शेतकऱ्याच्या वकिलाने केस जिंकली.
शेतकरी आनंदित होऊन आपल्या घरी जायला निघाला… तेव्हा वकील शेतकऱ्याला
आवाज देत म्हणाला… काका थांबा आणि जवळ येवून म्हणाला…
काका….! आपण केस जिंकली आहात… तसेच आपल्याला नुकसाभरपाई ही
मिळालेली आहे…. काका… आपण आता माझी फीस द्या.
शेतकऱ्याने वकिलांकडे अगदी वेड्यासारखे पाहत उत्तर दिले. आ…. आ….
वकील चकित झाला… त्याच्या लक्षात आले की…. आपला खोटेपणा आपल्यावरच
उलटलेला आहे…!
तात्पर्य : असत्य हे माणसावर कोणत्या ना कोणत्या रूपाने उलटतेच…
म्हणूनच जीवनात नेहमी सत्याने वागावे….!
बोधकथा – बुद्धी – Good Thoughts In Marathi – Marathi Moral Story
एक योगी श्री रामकृष्ण परामहंस यांना भेटला आणि म्हणाला….
महाराज… मी पाण्यावरून चालत जाऊ शकतो… समोर जी नदी आहे…
या नदीच्या पाण्यावर चालत जाऊन… मी त्या काठावर सहजच पोहचू
शकतो…!
रामकृष्ण परमहंस म्हणाले…. हो का…? तो सिद्ध योगी म्हणाला…..
हो महाराज… परंतु हे साध्य करण्यासाठी मी पूर्ण
चौदा वर्षा पर्यंत कठोर तप आणि साधना केली आहे…!
त्या योगी ने असे सागितल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले….
हा पाण्यावर चालण्याचा चमत्कार तर फक्त आठ आण्यांत हि
होऊ शकतो.
योगी आश्चर्याने विचारतो… कोण करतो….?
रामकृष्ण जी म्हणाले…. या नदीवर एक नाव चालविणारा नाविक आहे.
तो फक्त आठ आण्यांत कोणालाही या पाण्यावरून दुसऱ्या काठावर
पोहोचवितो.
तात्पर्य :- चमत्कारापेक्षा तुलनात्मक बुद्धी महत्वाची असते…!
बोधकथा – एकी – Sunder Vichar- Moral Story In Marathi
एक दोन तोंडाचा पक्षी, एका तळ्यात राहत होता…
एकदा त्याला एक रामफळासारखे गोड फळ खायला मिळाले.
तो फळ त्या पक्ष्याच्या एका तोंडाला खायला मिळाला तर…
पक्ष्याच्या दुसऱ्या तोंडाला त्याचा खूपच हेवा वाटला… आणि
त्याने पहिल्या तोंडाला अर्ध्या फळाची मागणी केली…
त्यावर पहिला तोंड त्याला म्हणाला… अरे… या फळाला
तू खाल्लेस काय…. आणि मी खाल्ले काय… शेवटी
आपला पोट तर एकच आहे…!
तेव्हा हे अर्धे फळ… मी आपल्या बायकोला देतो.
त्या पहिल्या तोंडचे हे असे बोलणे ऐकून दुसऱ्या तोंडाला
खूपच वाईट वाटले…! आणि त्या दिवसापासून तो तोंड
निराशही राहायला लागला…
असाच एक दिवश, एक खूपच विषारी फळ दुसऱ्या तोंडाला मिळाले.
ते बघितल्यावर पहिल्या तोंडाने ते नाही खाण्याचा सल्ला दिला…
परंतु…. मागील वेळच्या रागामुळे दुसऱ्या तोंडाने त्याचा सल्ला
ऐकलाच नाही…. आणि त्याने ते फळ खाल्ले…
शेवटी जे व्हायचे तेच झाले. तो दोन तोंडी पक्ष्याचा मृत्यू झालाच.
तात्पर्य :-
एकीने राहण्यातच गोडी असते…!
त्यात विरोध…. भांडण मुळीच होऊ देऊ नये.
बोधकथा – स्वभाव आणि छंद – Moral Story In Marathi
अनेकदा आपल्याला समानशीले व्यसनेषु सख्यम् म्हण ऐकायला मिळते…!
व याची कृती ही आपल्याला समाजात वावरतांना दिसून येते.
याच म्हणीचा दाखला देणारी ही एक बोधकथा.
अगदी एका साध्या संवादातून हा बोध आपल्याला मिळेल.
एकदा मोठ्या प्रलयकारी पुरात नदीच्या वाहत्या पाण्यातून दोन भांडी वाहत जात होतो…
त्या दोन भांड्यात एक भांडे पितळेचे होते… आणि दुसरे मातीचे होते मातीचे.
त्या मोठ्या पुरातुन वाहता – वाहता ते दोघेही आपसात बोलत चालले होते…
पितळीचे भांडे, मातीच्या भांड्याला म्हणाले… अरे… इतका लांबून का जात आहेस….?
माझ्याजवळ ये ना…! आपण दोघेही हातात हात घालून जाऊया…
बघ मग, कशा छान आनंद होतो ते… मस्त आनंद येईल जवळ ये तरी…!
मला ही तुला जवळून डोळे भरून पाहता येईल…
तसेच या प्रलयकारी मोठा वेग असलेल्या पाण्यापासून तुझा बचाव ही करता येईल.
पितळेच्या भांड्याचे कृतज्ञता व्यक्त करीत मातीच्या भांड्याने म्हटले की…
मी तुला विनंती करून सांगत आहे की… तू माझ्याजवळ नको येऊ….
मला सगळ्यात जास्त तुझीच भीती आहे…. कारण,
जर तुझा थोडासही मला धक्का लागला…. तर माझे तुकडे – तुकडे होतील…
तुझ्या आणि माझ्या शरीराचा भाव वेगवेगळा आहे….!
तात्पर्य :
वेगवेगळ्या स्वभावाचे… आणि छंदाचे लोक
एकत्र कसे काय येणार…?
बोधकथा – कर्तृत्वाचा गर्व – Moral Story In Marathi
एकदा सहदेव महाराजांना, आपल्या बुधाजी ने घरी आणले.
त्यांची आपल्या शेतावरच्या बंगल्यात राहण्याची व्यवस्था करून दिली…
शेतावरील बंगल्यात महाराजांची पूजा – अर्चना ध्यान – धारणा सगळे
एकदमच चांगले चालत होते.
एक दिवश सकाळी – सकाळी बुधाजी, सहदेव महाराजांसोबत…
आपल्या शेताच्या बांधावरून चालले होते… बुधाजी महाराजांना
आपली स्वतःच्या कष्टाने बनवलेली शेती दाखवित होता.
एवढा मोठा शेत मी एकट्यानेच उभा केला आहे…
तसेच खूप चांगल्याप्रकारे हा संपुर्ण शेत मी एकटाच सांभाळत आहे….!
हे थोड्या अभिमानाने महाराजांना दाखवित होता.
हे महाराजांच्या लक्षातही आले होते…
महाराज शांतपणे म्हणाले…
बुधाजी तुझा एवढा मोठा शेत मला बघणे शक्य नाही….
तू असे कर… हा संपूर्ण शेत मला नकाशावर दाखव ना.
बुधाजी नकाशावर दाखवायला तयार झाला…
आणि घरी आल्यावर संपूर्ण शेताचा नकाशा काढला…
तसेच नकाशात माप ही टाकले… आणि संपुर्ण शेताचा नकाशा
तयार केला… त्यात आपले शेत दाखविले…
सहदेव महाराजांनी नकाशा बघितला व आपल्या हातात एका सुईला
घेत म्हणाले… बुधाजी या जगाचा जो अफाट पसारा आहे…
त्यात आपली पृथ्वी ह्या सुईच्या टोका एवढी आहे…!
त्यातच आपला देश… राज्य… जिल्हा… तालुका…. आणि शेवटी तुझे हे गाव….
आता बुधाजी या गावातील तुझी शेती मला दाखव तर…
हे महराजांचे बोलणे ऐकल्यावर बुधाजी लज्जित झाला….
क्षणातच त्याचा गर्वाचा नायनाट झाला…!
तात्पर्य :
जर कर्तृत्वाचा गर्व बाळगला तर विनाश ठरलेलाच असतो…
आणि नम्रता बाळगली तर… उन्नती निश्चित असते…!
[…] Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – कहाणी संग्रह […]