मुलगी कविता – तरीही मुलगी जगतच राहिली…! –
Mulgi Kavita – marathi kavita
मुलगी-कविता-तरीही-मुलगी-जगतच-राहिली-Mulgi-Kavita-marathi-kavita-विजय-भगत-मुलगी-वाचवा-मुलगी-सुविचार |
आली मुलगी जन्माला आणि वडिलाने नाक मुरडले.
तरीही मुलीने वडिलांचे बोट धरले…!
मुलगी चालायला लागली तर…
बाहेर जाऊन मातीत खेळायला लागली…
आईने घरात खेळायला सांगून बाहुली दिली.
तर मुलगी आनंदात बाहुली सोबत खेळू लागली.
मुलगी भावांसोबत खेळायला लागली तर…
घरच्यांनी मुलांमध्ये खेळू नको असे बजावले…
तरीही मुलगी भावांचे खेळ बघूनच आनंदी राहिली.
मुलगी शाळेत जाऊन अभ्यास करू लागली तर…
आजीने घरातील कामें सांगितली…
तरीही मुलगी सगळी कामे करून अभ्यास करू लागली.
मुलगी मोठी झाल्यावर…
आपल्या आवडीच्या वस्तू मागू लागली…
गरिबीने मुलीला परिस्थितीची चाहूल लागली…
तरीही मुलगी समाधानीच राहू लागली.
मुलगी मोठ्या शिक्षणाची स्वप्न पाहू लागली…
पण घरच्यांनी तिच्या लग्नाची घाई केली…
तरीही मुलगी आपले स्वप्न मागे टाकून पुढे गेली.
मुलगी लग्न करून सासरी गेली…
अनोळखी, परक्या लोकांसोबत राहिली
तरीही सोबत आठवणी घेऊन गेली.
मुलगी आपल्या बाळासोबत रमून गेली…
सासरच्यांनी त्रास दिला…
तरीही मुलगी आपल्या बाळासाठी जगतच राहिली.
मुलगी घरातच राहिली, नवऱ्याने तिचा उद्धार केला…
तरीही मुलगी आपले स्वप्न आणि अपेक्षा सोडून जगतच राहिली.
शेवट पर्यंत मुलगी मुलांसाठी झुरत राहिली, मुलांनी तिला लांब केले,
तरीही मुलगी आपल्या पिल्लांची काळजी करतच राहिली.
मुलगी शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांसाठीच जगत राहिली.