इमानदारीचे फळ- Motivational Story | प्रेरणादायक छान गोष्ट

0
285
इनामदारीचे-फळ-सुविचार-प्रेरणादायक-गोष्ट
इनामदारीचे-फळ-सुविचार-प्रेरणादायक-गोष्ट

इमानदारीचे फळ- Motivational Story | प्रेरणादायक छान गोष्ट

ऑफिसमधुन परततांना रजनीने भाजीबाजाराच्या बाजूला गाडी थांबवायला
ड्रायव्हरला सागितले आणि रजनी गाडीतून उतरुन भाजीपाला घ्यायला
निघाली. तसे रजनीला ताजीतवानी भाजी घ्यायला खूप आवडायचे पण
जिल्हाधिकारी झाल्यापासून दरदिवशी वेळ काही मिळत नव्हता तरीही
जमेल तेव्हा रजनी भाजीपाला घ्यायला नक्कीच जायची.

त्या दिवशी भाजीच्या दुकानावर एक आठ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी
बसली होती. भाजीचा घेऊन झाल्यावर रजनीने त्या भाजीवाल्या मुलीला पैसे दिले.
तेवढ्यातच तिचा फोन वाजला आणि ती बोलत बोलत आपल्या गाडीकडे निघाली.
गाडीजवळ काहीवेळ बोलली आणि फोन ठेवल्यावर ती गाडीत बसायला लागली
तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखे जाणवले. चमकून तिने मागे
वळून पाहीले तर भाजीवाली मुलगी उभी होती.

रजनी म्हणाली, काय झाले… तुला पैसे तर मी दिले आहेत….
त्या मुलीने काही न बोलता पर्स पुढे केली… आणि म्हणाली
आपली हि पर्स दुकानातच राहिले होते…

रजनीने आपली पर्स हातात घेवून बघितले… पर्स मधील पैसे आणि
सगळी वस्तू बरोबर होती. रजनी ला त्या मुलीच्या इमानदारीचे फार
कौतुक वाटले.
धन्यवाद बेटा… तुझे नाव काय आहे…? अश्विनी…..
तेवढ्यात फोन वाजला आणि रजनी बोलता बोलता गाडीत बसून
निघून गेली. मुलीने गाडीला जातांना बगून ती आपल्या दुकानाकडे
निघाली.

इमानदारीचे फळ

रात्रीला जेवण झाल्यावर रजनी झोपायच्या तैयारीत होती तसाच अचानक तिला
त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली… आणि तिला स्वतःचाच भूतकाळ
आठवायला लागला. माझ्यासोबत हि तर असेच झाले होते आणि त्या इमानदारीचे
फळ म्हणजे मी आज जिल्हाधिकारी आहे. घडलेली घटना रजनीच्या डोळ्यासमोर
यायला लागली.

अंदाजे 20 वर्षांपुर्वीची ही गोष्ट…. रजनी शाळा सुटल्यावर घरी जात असतांना
तिला रस्त्यावर, पैशाने भरलेला एक पाकीट पडलेला दिसला. तिने तो पाकीट
उचलून बघितले तर नोटांनी गच्च भरलेला होता, थोडा वेळ तर रजनी घाबरली….
तसाच तिला गुरुजीने शाळेत शिकविलेला ईमानदारीचे फळ गोड असते…
हा आठवलाच….

म्हणून…! ते पाकिट तिथेच टाकून द्यावे असे तिला वाटू लागले. काय करावे आणि
काय नाही या विचारात तिने आजूबाजूला बघितले तर जवळच रस्त्याच्या बाजूला
एक व्यक्ती आपल्या कार ला टेकून फोनवर बोलत होता… रजनी ला वाटले हा
पाकीट नक्की ह्या माणसाचाच आहे म्हणून ती त्याच्याजवळ जाऊन,
काका-काका म्हणत त्या माणसाचे लक्ष आपल्याकडे केले…

तो माणूस, ह्या मुलीने बोलण्यात अळथळा आणला म्हणून थोडा रागातच
बोलला काय आहे…? त्यावर रजनी ने पाकीट दाखवत म्हणाली काका हे
पाकीट तुमचे आहे काय…?

तो एकदम चमकून आपल्या खिशाला हाथ लावायला लागला…
हो.. हो… हे तर माझेच पाकीट आहे बेटा… तुला कुठे सापडले…
तिकडे पडलेले होते… त्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली….
लगेच त्या माणसाने आपले पाकीट उघडून बघितले…
सगळे व्यवस्थितपणे पाहून पाकीट खिशात ठेवला…!

तोच मागून आलेल्या गाडीने हॉर्न वाजविला…. तर तो आपली गाडी
बाजूला करण्यासाठी गाडीत बसला आणि रजनी आपल्या घराच्या
रस्त्याला लागली.

चालता चालता रजनी खूप आनंदी होती… आपल्या इमानदारीचा तिला
अभिमान वाटत होता… तिला असे वाटत होते कि ती केव्हा घरी पोहचते
आणि आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगेल…

रजनी घरी पोहोचताच आई-आई हाक मारायला लागली… तिची आई पोळ्या
करीत होती. शाळेचा दफ्तर बाजूला फेकत ती धावत आईजवळ गेली आणि
सगळा प्रकार आनंदाने सांगितला….

रजनीला वाटले होते कि आई तिला शाबासकी देईल, पण आईने पोळ्या करणे
सोडून उभी झाली आणि रजनी चा हात पकडून त्या लाटण्यानेच मारायला
लागली…

कारटे… घरी खायला काही नाही आहे आणि तुने हातातली लक्ष्मी फेकून दिली….
गरज काय होती तुला ते पाकीट परत करायची. रोडावरून उचलून सरळ
आपल्या दप्तरात टाकुन मुकाट्याने घरी यायला पाहिजे होते…
तुला कोणीही काही बोलू शकला नसता….
असे बोलत जायची आणि रजनीला मारत जायची.

इमानदारीचे फळ

रजनी जोरजोरात रडत होती…. आणि आईला “नको ना मारु आई”अशी
विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच
रजनीची सुटका झाली.

काही वेळातच तिचे बाबा घरी आले तेही दारू पिऊन होते…
रजनीचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झाले विचारले.
रजनीने काही सांगण्या आधीच तिच्या आईने सगळा
प्रसंग एका श्वासातच नवऱ्याला सांगितला…

रजनीला वाटले होते की वाटले बाबा नक्की तिला सहानभुती दाखवतील…
पण तिच्या बाबाने तिच्याच जवळ पडलेल्या दप्तरातील पट्टी काढली आणि
रजनीला मारायला सुरुवात केली…

रजनीला मारणे चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात
थरथर कापत रडत होता. जणू काही त्याला, इमानदारी
दाखवल्यावर काय होते याचा धडाच त्याचे आईबाबा त्याला देत होते.

रजनीला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.
मार खाऊन थकलेली रजनी जेवन न करता तसीच झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी रजनीने घडलेला प्रसंग आपल्या शाळेतल्या मैत्रिणींना
सांगितला. तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली…
त्यांनी रजनीलाच दोषी ठरवले.

तीन दिवसांनी संध्याकाळी रजनी आपल्या झोपडीत अभ्यास करत असतांना
तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाठोपाठ दारावर टकटक
ऐकू आली. तिची आई दार उघडून बाहेर गेली. रजनी बाहेर ये. हे कोण
आलेत बघ….

घाबरता घाबरता रजनी बाहेर आली. समोर एका महागड्या कार जवळ
एक माणूस उभा होता. होय…! तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट
उचलून दिले होते.

तिला पाहून तो हसला. हीच ती मुलगी… तो रजनीच्या आईला म्हणाला.
पोरी… त्या दिवशी तुझे आभार मानायचे आणि तुला बक्षीस द्यायचेही
राहून गेले. बोल काय पाहीजे तुला…?

रजनी ला काही कळेनासे झाले… एकदम ती भांबावल्या सारखी
बघू लागली… काय बक्षीस मागावे… हे काही तिला कळेना.
तोच रजनीच्या कानावर शब्द पडले….
आईस्क्रीम…! हो आईस्क्रीम….
मला आईस्क्रीम पाहीजे…..

रजनीच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.
रजनीने ही हो मध्ये मान डोलावली.

त्यावर पर्स वाले काका म्हणाले… तर चला मग… बसा गाडीत…..
त्या महागड्या गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघे उत्साहित झाले
आणि पटकन गाडीत जाऊन बसले.

रजनीच्या आईने असमाधानाने त्यांच्याकडे पाहीले आणि मनातच
बोलायला लागली की या माणसाने… या आईस्क्रीम ऐवजी
पाचशे किंवा हजार रुपये बक्षीस म्हणून दिले असते तर
संसार चालवायला काही मदत तरी झाली असती…

त्या काकाने अगोदर दोघांना भेळ, पाणीपुरी घेऊन दिली.
त्या नंतर मनसोक्त आईस्क्रीम चारली… आणि त्यांना
घरी परत आणले…

ते जेव्हा घरी परत आले तेव्हा रजनीचे बाबा घरात बसले होते…
एका तुटलेल्या खुर्चीवर ते काका बसले आणि म्हणाले…
आपली मुलगी खूप इमानदार आणि चांगली हुशार ही आहे.
आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला काही प्रश्न विचारले.
खुप छान उत्तरे दिली ह्या मुलीने. मला असे वाटत आहे की,
तिचे नाव तुम्ही एखाद्या चांगल्या शाळेत टाकावे.

साहेब, आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसे.
आम्हाला ते कसे जमणार…? रजनीचे बाबा हात जोडत म्हणाले…

तुम्ही काही काळजी करु नका. रजनीच्या शिक्षणाची जवाबदारी
मी घेतो… सगळा खर्च मी करणार…. मात्र तिला या ठिकाणी
ठेवता येणार नाही… तिला आपण वसतीगृहात ठेवू…
त्याचाही खर्च मीच उचलणार.

इमानदारीचे फळ

रजनीच्या बाबाला असे वाटले की… चाला खाणारे एक तोंड कमी होणार..
म्हणून ते म्हणाले.. आम्हाला तर आनंद होत आहे… पोरीचे भले होत आहे…

त्या काकाने रजनीला सरकारी शाळेतून मोठ्या शाळेत टाकले…
आता रजनीचे फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी
नवीन इस्त्री केलेला कडक शाळेचा ड्रेस आणि चकचकीत बुट आले.
नवीन कोरी पुस्तके, आधुनिक शाळेचा दप्तर आला.

त्या पटापट इंग्रजी बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब रजनी दबकत होती…
तसेच हि मुलगी झोपडपट्टीतून आली आहे हे माहित झाल्यावर
बाकीची मुले मुली तिला टोचून बोलायचे. तिची टिंगल उडवायचे…

बिचारी रजनी कोपऱ्यात जाऊन रडत बसायची. पण हा प्रकार
लवकरच थांबला जेव्हा अर्धवार्षिक परीक्षेत रजनीचा पूर्ण वर्गातून
पहिला क्रमांक आला. यानंतर रजनीने काही मागे वळून पाहीले नाही.

सातव्या वर्गात स्काँलरशिप मिळवून रजनीने काकांवरचा
आपला भार थोडा कमी केला. दहावी बोर्डाच्या परीक्षेत ती पूर्ण
जिल्ह्यात प्रथम आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत काकांनाही
फार आनंद झाला.

नंतर एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला.
बारावी बोर्डाच्या परीक्षेत तर रजनीने कमालच केली.
ती राज्यात प्रथम आली. ते कळताच काकांनी रजनीला मेडिकल
काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवले. पण तिला आय.ए.एस.
करायचे होते. तिचा निर्णय ऐकून काकांनी तिला विरोध केला नाही.

पदवी मिळवल्यावर रजनीने युपीएससीचा अभ्यास सुरु केला. कोणतेही
कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली.
एक झोपडपट्टीतील मुलगी जिल्हाधिकारी झाली.

काकांना कळाल्यावर रजनीला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले.
त्यांचा भव्य बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले. बंगल्यापेक्षाही
भव्य असलेल्या त्यांच्या मनाने रजनी भारावून गेली.

इमानदारीचे फळ

काकांनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करुन दिली. रजनी
माझी मुलगीच आहे असे ते सारखे म्हणत असतांना रजनीला
अश्रु अनावर होत होते.

तिच्या इमानदारीचे केवढे मोठे बक्षीस काकांनी तिला दिले होते.
तिच्या जिल्हाधिकारी बनण्याच्या आनंदात काकांनी रजनीच्या
पूर्ण वस्तीला जेवण दिले. आईवडिलांच्या तर आनंदाला
पारावर उरला नव्हता.

एक मुलगी शिकली की घरादाराचा स्वर्ग बनवते हे रजनीने सिध्द
केले होते.

नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आईवडिल आणि भावाला
त्या वस्तीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवले. भावाला चांगल्या
काँलेजमध्ये घातले. वयस्कर वडिलांना मजूरी सोडायला लावून दुकान
उघडून दिले.

सकाळी रजनी परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलिस अधिक्षक
असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटले.

आज सकाळी सकाळी कुठे…? नवऱ्याने विचारले
काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला
आयुष्यभराचे बक्षीस द्यायला निघाली आहे…
हे सांगतांना रजनीच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच
एक ठाम निश्चय दिसत होता.

इमानदारीचे फळ- Motivational Story | प्रेरणादायक छान गोष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here